Posted On: November 3rd 2026, 08:44 pm
जीवनात अनेकदा आपल्याला असं वाटतं की, एखादी छोटीशी चूक केली किंवा कोणाला थोडंसं फसवलं, तरी काही बिघडत नाही. आपण केलेली चूक कोणाच्या लक्षात येत नाही आणि वरवर सगळं शांत व व्यवस्थित सुरू राहतं. मग हळूहळू अशा छोट्या चुकांची सवय लागते. आपल्याला वाटत राहतं की, आपण प्रत्येक गोष्ट सहजपणे सांभाळू शकतो आणि परिस्थितीवर आपलं नियंत्रण आहे. मात्र, दुसऱ्याला फसवण्याच्या या प्रयत्नांत कधीतरी आपण स्वतःच अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत अडकतो की, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडत नाही. म्हणूनच आयुष्य जगताना कोणाची फसवणूक करून मिळवलेली शांतता ही कधीच खरी शांतता नसते. समाजात वावरताना नेहमी सत्याची साथ, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानाची जपणूक केली पाहिजे.